
भारतीय किसान सभाः राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, कर्जमाफी ऐवजी कर्जमुक्तीसाठी उपाय योजनांची मागणी
परभणी, दि.1 (प्रतिनिधी)ः कृषि उत्पादनांचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असून उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. त्यामुळेच सरकारने कर्जमाफी पेक्षा शेतकर्यास कर्जमुक्त करण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारीत भाव द्यावा अशी मागणी भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महामंत्री बद्रीनारायण चौधरी यांनी केली.
भारतीय किसान सभेच्या अखिल भारतीय प्रतिनिधींची 3 दिवसीय बैठक परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रांगणात शुक्रवारी सुरू झाली. त्याच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी किसान संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री बसवेगौडा, उपाध्यक्ष प्रभाकरराव केळकर, उपाध्यक्ष अंबालाल पटेल, श्रीमति विमला जी तिवारी, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक गंगाधरराव पवार, आदी व्यासपीठार विराजमान होते.
याप्रसंगी महामंत्री चौधरी यांनी संपूर्ण वर्षभरातील किसान संघाच्या कार्यक्रमासह उपक्रमाचा आढावा सादर केला. तसेच देशातील शेती संबंधी परिस्थितीचाही तपशीलवार उहापोह केला. विशेषतः संपूर्ण देशात आवश्यक प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन केल्याबद्दल चौधरी यांनी शेतकरी वर्गाचे तसेच कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. विशेषतः मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कापूस, दाळ व अन्य पिकांच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोदगार काढले. गेल्या वर्षात रब्बी मोसमात पीक उत्पादन चांगले झाले. परंतु सरकारी घोषणानंतर देखील पिकाला न्युनतमत समर्थन मुल्य न मिळाल्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थानी आदी राज्यात सर्वसामान्य शेतकरी अक्षरशः हतबल झाला. याच शेतकर्यांनी अस्वस्थतेपोटी, स्वयंस्फुर्तीने आंदोलने केली. सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.असे नमुद करीत चौधरी यांनी कृषि उत्पादनांचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असून उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. त्यामुळेच सरकारने कर्जमाफी पेक्षा शेतकर्यास कर्जमुक्त करण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारीत भाव द्यावा अशी मागणी केली.
याप्रसंगी प्रांताध्यक्ष ज्ञानेश्वरराव तुपे यांनी आपल्या प्रास्ताविकातून किसान सभेच्या एकूण वाटचालीसंदर्भात उदापोह केला. या सभेस महाराष्ट्रासह देशभरातून 34 प्रांतातून आलेल्या सुमारे 350 प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी प्रात उपाध्यक्ष सुभाष देशमुख, जिल्हा मंत्री बळवंतराव कौसडीकर हे उपस्थित होते.
यावेळी गो पुजन, नांगर पुजन, किसान संघाच्या ध्वजरोहणाने सभेस सुरूवात झाली.